आज अचानक तुझी आठवण आली.. खूप दिवसांनी
इतके दिवस स्वत:ला तुझ्यापासून, तुझ्या आठवणींपासून दुर नेत होते.
कारण..
तुझी फ़क्त एक आठवण आली की, काय काय होतं माहितीये
मी बराच वेळ तुझ्या आठवणींमध्ये रमून जाते..
मग उगाचच काहीतरी सुचायला लागतं,
केवळ ते तुझ्यामुळं सुचतयं म्हणून मग मी लिहीत जाते..
मग दोन... तीन... चार.... अशी वाक्याला वाक्यं जुळून येतात,
प्रत्येक वाक्यात पाच-सहा शब्द, तेही तुझेच .. मागे-पुढे रेलून बसतात.
शब्दांमधली अक्षरं गालातल्या गालात हसत राहतात.
मग उगाचच कुठेतरी स्वल्पविराम टाकते.
जिथे शब्द जास्तच धीटपणे बोलतायेत वाटलं की पुर्णविराम.
आणि हे कल्पनेतलं वाटावं म्हणून मग उद्गारवाचक चिन्हं लावते दोन चार
अस करत करत मग पान भरून काहीतरी तयार होतं.
मग त्याला 'कविता' म्हणून नाव देत मी मोकळी होते, मग ती दोन तीन मित्र मैत्रिणी ना पाठवते,
कुणी छान म्हणतं.... कुणी फ़क्त हसतं....
पण या सगळ्यापासून अनभिद्न्य तू कुठेतरी दूर दूर असतोस
तुला या सगळ्याशी काहीही देण घेणं नसतं
आणि मला मला मात्र ती कविता वाचून पुन्हा तुझीच आठवण येते ...
आणि तुझी आठवण आली की...
काय काय होतं माहितीये..
मी बराच वेळ तुझ्या आठवणींमध्ये रमून जाते
मग उगाचच काहीतरी सुचायला लागतं.....
- अनामिक

No comments:
Post a Comment